थँक यु

#थँक यु
सकाळी सकाळी येणाऱ्या सूर्याच्या किरणाने सगळी पृथ्वी नुसती न्हाऊन निघत नाही तर जणू काही प्रभावित होते. सूर्याचं आगमन सगळ्यांमध्ये चैतन्य आणि उत्साह भरतं.  आपल्या आयुष्यात अशीच अनेक माणसं येत असतात. त्यांचा प्रभाव आपलं आयुष्य घडवत असतो. आपले आईवडील, गुरू, मित्र , नातेवाईक, शेजारी सगळेच त्यांच्या परीने आणि पद्धतीने आपल्या जडणघडणीत सहभागी असतात. यापैकी कुणाचा प्रभाव आनंददायक असतो कुणाचा नसतो. पण दोनहीं प्रसंगात आपल्याला काही न काही शिकायला मिळतच. नकळतच आपण कुणाकडून एखादी गोष्ट कशी करावी हे शिकतो तर कुणी जाणूनबुजून कसं वागू नये हे स्वतःच्या कृतीतून शिकवत असतं. आपल्याला गरज असते ती सजग आणि स्वच्छ नजरेने सगळं बघण्याची.  फक्त माणसाचं नाही तर निसर्गही आपल्याला शिकवत असतो. निरपेक्ष वृत्तीने देत राहावं हे आपल्याला तो शिकवतो. प्राणीही न बोलता खूप काही शिकवत असतात. जमतं का पण आपल्याला सगळ्यांकडून सगळं घेणं??? नाहीच जमत सगळं घेणं पण त्यातलं थोडं जरी घेता आलं तरी पुरतं आयुष्यभर.
मग आता या विकएंड ला जरा आळस झटकून खऱ्याखुऱ्या प्रभावी गुरूंना शोधू ज्यांच्यामुळे आपलं आयुष्य सुकर आणि सोप्प झालं आहे. शोधून काय करायचं तर फक्त छानसं स्माइल आणि २ शब्द थँक यु / धन्यवाद म्हणून ती कृतज्ञता व्यक्त करू. एक अजून एक गोष्ट करता येईल ती म्हणजे त्या व्यक्तीचा एक चांगला गुण टिपून तो नक्की वापरण्याचा प्रयत्न करायचा. मी पण प्रयत्न करणार आहेच तुम्हीही बघा जमतंय का ??
प्रत्येकाला आज एक तरी क्षण प्रयत्नांना यश देणारा मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!
#गौरीहर्षल
८.७.२०१७

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी आणि करुणात्रिपदी

आज कुछ अच्छा पढते हैं

कालाय तस्मै नमः कथेमुळे वाचकांना आलेला अनुभव