नकार देण्याची कला भाग 1

#नकार_देण्याची_कला_भाग1
"मला नाही म्हणता येत नाही हो मॅडम.", ती टेबलवर समोर ठेवलेल्या पेनशी खेळत म्हणाली. पेनशी खेळणं तिच्या मनात असलेली अस्वस्थता दाखवत होते. 
"म्हणजे मी खूपदा ठरवते की आता पुन्हा तीच गोष्ट करण्यासाठी होकार द्यायचा नाही. पण समोरच्या व्यक्तीने गळ घातली की माझ्याकडून नकळतच हो म्हटल जातं. आणि मग पहिले पाढे पंचावन्न. ", हे बोलता बोलता नकळतच तिच्या डोळ्यात पाणी आलं होत. कौन्सिलींग सेशनमध्ये आलेल्या व्यक्तीचं हळव होऊन रडणं हे अपेक्षितच असतं. 
ती , तुमच्या माझ्या सारखीच एक व्यक्ती, गृहिणीही असू शकते किंवा नोकरी-व्यवसाय करणारीही, स्त्रीही असू शकते किंवा पुरुषही. 

 मी नेहमी म्हणते की, आपण प्रत्येकाने आयुष्यात स्वतःला कधीतरी हो म्हणून बघावं. पण ते म्हणण्याआधी स्वतःच्या मनाची तयारी केलेली हवी. 
इतरांच्या नजरेत वाईट होऊ नये म्हणून आपण बऱ्याचदा स्वतःला नकार देत इतरांना होकार देत असतो. परिणामी आपलं बरच नुकसान होतं. 

तुमचं ही असंच होतं का? दर वेळेला तुम्ही ठरवता की आता पुढच्या वेळी स्पष्ट शब्दात नकार कळवायचा पण त्या वेळेला भिडस्तपणामुळे नकार कळवता येत नाही?
शिवाय मनात ही भीती सुद्धा असते की मी नाही म्हणालो तर समोरची व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करेल? इतर लोकांना काय सांगेल? आणि मग आपण मनाविरुद्ध होकार देऊन मोकळे होतो. 

एखाद्या गोष्टीला नकार कळवणं म्हणजे समोरच्या व्यक्तीचा अपमान करणे असा त्याचा अर्थ होत नाही. तर तो नकार म्हणजे ती गोष्ट आपल्याला करता येणं शक्य आहे की नाही? ती गोष्ट करण्याव्यतिरिक्त आपल्यासमोर कोणत महत्त्वाचं काम आहे? हे योग्य भाषेत आणि योग्य शब्दात समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे जे आपल्याला जमायला हवं. 

 सातत्याने जर आपल्याकडून इतरांचं मन राखण्यासाठी स्वतःच्या मनाविरुद्ध होकार दिला जात असेल तर कालांतराने लोक आपल्याला गृहीत धरायला लागतात. 
आणि मग कधीतरी अचानक आपल्याला आपण या सगळ्यांमध्ये अडकल्याची जाणीव होते. स्वतःच्या मनासारखं जगता येत नाही, कुठली गोष्ट करता येत नाही, कुठे जाता येत नाही कारण आपल्याला इतरांना नाही म्हणता येत नाही. 
 इतरांची मन राखताना आपण आपल्या मनाचं ऐकायचं बंद करून टाकतो का? 
 आणि जर खरंच आपल्याबरोबर असं होत असेल तर त्यावर वेळीच काहीतरी उपाय करणे गरजेचे आहे. 
 जर एकीकडे आपण असं म्हणतो की आपल्याला निदान आपल्या जवळच्या लोकांसाठी तरी काहीतरी करायच आहे पण त्यामध्ये आपण स्वतःसाठी करायचं विसरून जातो तर आपल्यासाठी आपणच जवळचे नसतो का? 
अशावेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपण शिकणं गरजेचं असतं ती म्हणजे नकार देण्याची कला. 
येस.... समोरच्या व्यक्तीला न दुखवता, नात्यात दरी येऊ न देता आपला नकार त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे शिकणं गरजेचं आहे. 
आणि सोबतच काही टर्म्स आणि कंडीशन लक्षात ठेवणेही आवश्यक आहे. 
टर्म्स आणि कंडीशन कसल्या तर...

***पहिली गोष्ट ही की नकार देण्यासाठी आपली मनाची तयारी झालेली हवी. कारण बऱ्याचदा आपण नकार देतो पण मग कुठेतरी मनात अपराधीपणाची भावना (गिल्ट फिलिंग) घर करू लागते. तर ते होऊ नये म्हणून प्रयत्न करावे लागतील. 

***दुसरी गोष्ट म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला कितीही जेन्युईनपणे आपली बाजू सांगितली तरीही ती व्यक्ती तिच्या मनस्थिती , दृष्टिकोन ह्यानुसारच प्रतिक्रिया देणार. प्रत्येक जण तुमचा नकार मनापासून स्विकारेलच अस नाही. पण मग नकार देऊन काय उपयोग? असंही तुम्हाला वाटेल. तर त्यासाठी तिसरा मुद्दा वाचा. 

***होकार किंवा नकार हा आपण इतरांना खुश किंवा दुःखी करण्यासाठी देत नाही आहोत तर होकार / नकार देण्यामागचं आपलं कारण हे स्वतःला प्राथमिकता देणं आहे. स्वतःच्या गरजांना,भावनांना ओळखणे हे आहे. आणि जेंव्हा आपण स्वतःला प्रायोरिटी म्हणून बघायला सुरुवात करतो तेंव्हा सगळ्यात जास्त विरोध स्वतःकडूनच होतो.
 तीच ही पहिली पायरी असते जिथे आपल्याला गरज पडल्यास योग्य तज्ञ व्यक्तीशी बोलणही गरजेचं असतं. 
कारण नवीन सुरुवात करायची ठरवून चालत नसते तर त्या मार्गावर चालण्यासाठी शक्य ती मदत स्विकारण्याची तयारीही ठेवावी लागते. 

तर इथे एक छोटासा टास्क सांगते. पुढचा एक आठवडा म्हणजे सात दिवसात कमीत कमी दोन तरी गोष्टी अशा करण्याचा प्रयत्न करा ज्या करताना तुम्हाला मनापासून आनंद मिळतो. मग ते गल्लीत क्रिकेट खेळणे असो किंवा गोळा खाणे किंवा अजून काही तुम्ही ठरवा. स्वतःला नकार द्यायचा नाही ही अट आहे बर का!!!
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु !!!
नवीन काहीतरी ऑन द वे आहे ✌️✌️✌️
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 

टिप्पण्या

Swapnali C Jadhav म्हणाले…
Agadi khar samgitle Tai tumhi
Kadhi kadhi kharach garajech aste ekhadyala nakar dene pan aapan nahi kart tase aani mag tras hoto aplyala
सुप्रिया मते म्हणाले…
खरे आहे. Thanks पुन्हा एकदा स्वतःला काय गरजेचे aahe हे लक्षात आले.
Unknown म्हणाले…
thank you कधी कधी नकार देण गरजेच असत हे पटलय व हळूहळू जमायला लागलय
Smita Prashant म्हणाले…
अगदी बरोबर. नकार द्यायची कला शिकावीच लागते.
प्रज्ञा म्हणाले…
खरं आहे ताई. तुम्ही किती बारकाईने ,खोलात जाऊन विचार केला आहे ( नेहीप्रमाणेच). सगळ्या शक्यता विचारात घेऊन काय नि कसं करायचं, कारण नकार देणं ही खरंच खूप कठीण गोष्ट आहे . आणि हो, तुम्ही सांगितल्याप्रमणे दोन गोष्टी नक्की करणार.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी आणि करुणात्रिपदी

आज कुछ अच्छा पढते हैं

कालाय तस्मै नमः कथेमुळे वाचकांना आलेला अनुभव