गारूड

गारुड

विकेंडच काम नाही म्हटलं तरी बरंच लांबल होतं. 
शेवटच्या बसमध्ये कसाबसा घुसत तो गावाकडे निघाला होता. ती बससुद्धा आज काही बिघाड झाल्यामुळे त्याला मिळाली होती. नाही तर रात्री ८ नंतर गावाकडे जाण्यासाठी एकही बस नसायची.

बायको आधी बाळंतपण म्हणून आणि मग बाळाच्या   दोन्ही आजीआजोबांचा हट्ट म्हणून हल्ली गावीच राहत होती. त्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता. कारण सुरुवातीला  बाळाला आणल्यानंतर  काही दिवस दोघांची प्रचंड तारांबळ उडत होती. त्यात त्याच्या घरी येण्याची वेळ निश्चित नव्हती. मग शेवटी अजून काही महिने तरी बाळ गावीच राहील अस ठरलं होतं आणि त्याला सांगण्यात आलं होतं. 

गावी काय हाकेच्या अंतरावर सासर माहेर असल्याने बायकोही निवांत झाली होती. पण त्याची काळजी मात्र तिला असायची. ती होती तोपर्यंत त्याचं सगळं वेळच्या वेळी होत होतं पण नसताना सुद्धा अडणार नाही हे तिने बघितलं होतं. 

विकेंडला आला की कोरड्या फराळाचे डबे सोबत जात होते. आणि इतर वेळेसाठी तिने जवळच्या एका मावशींकडे डब्याची सोय केली होती. इनशॉर्ट स्वतःच्या बाळाला जरी आई आणि सासूच्या हातात सोपवलं असलं तरी सासूच्या बाळाची काळजीही ती घेत होती. 

गाडीत बसायला जागा मिळाली, तस त्याने सीटवर मागे डोकं टेकवून डोळे मिटून घेतले. थकल्यामुळे त्याचा डोळा लागला. जाग आली तेंव्हा गाडी सेकंड लास्ट स्टॉपवर होती. त्याचा शेवटचा स्टॉप होता. गाडीत आता बोटावर मोजण्याएव्हढी माणसं उरली होती. 

इकडे तिकडे नजर फिरवताना त्याचे डोळे एका ठिकाणी स्थिर झाले. ड्रायव्हरच्या मागची सीट होती. तिथे कुणीतरी बसलं होतं. कोण आहे हे पाठ असल्याने लक्षात येत नव्हतं. ती स्त्री आहे हे त्याला तिचा पदर हलला तेव्हा लक्षात आलं. आता ती मागे वळणार तेवड्यात कुणीतरी मागून भराभर चालत उतरण्यासाठी पुढे गेला. आता त्या सीटवर कुणीच दिसत नव्हतं. 

आपल्याला भास झाला अस समजून त्याने खिडकीबाहेर नजर टाकली तर गाडी स्लो झाली तिथे कुणीतरी त्याच्याकडे बघून हात हलवत होतं. त्याला काही समजलं नाही. तो काही रिएक्शन देणार तेवढ्यात त्याचा फोन वाजला. 

फोनच्या रिंगटोन मुळे तोच काय सगळी बस भानावर आली. आणि चकव्या कडे  जाणारी बस गावाच्या दिशेने वळली. 

त्याने फोन उचलून बायकोला जवळच आलो आहे असं सांगितलं आणि तो आजूबाजूला बघू लागला. 

ड्रायव्हर जवळ जाऊन कंडक्टर काहीतरी विचारत होता. आणि ते दोघे पुन्हा पुन्हा वळून त्याच्याकडे बघत होते. त्याला जरा विचित्रच भासलं सगळं पण  तेवढ्यात कंडक्टर त्याच्या दिशेने आला आणि त्याने त्याला विचारलं , "ओ भाऊ जरा तुमचा नंबर देता का? किंवा मग ही रिंगटोन द्या " 

"कशासाठी?", त्याने विचारलं. 

" सांगतो उतरल्यावर पण इथं फोनच नेट नाही चालणार एखाद्या वेळी निदान रिंगटोन तरी वाजवता येईल. "कंडक्टर अजिजीने म्हणाला. 

त्याने रिंगटोन दिली. आणि नंबरसुद्धा. 

गावाच्या अगदी अलीकडे बस स्लो झाली आणि बसमधलं वातावरण अचानक बदललं. 
अचानकच खूप सारे हसण्याखिदळण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. सोबतच बांगड्या, पैंजण ह्यांची किणकिण सुरू झाली. दिसत कुणीच नव्हतं पण आवाज ऐकू येत होते. 

ड्रायव्हर कसाबसा बस चालवण्याकडे लक्ष देत होता. 

तर कंडक्टर बसच्या दाराकडे डोळे मोठे करून बघत होता. 

उरलेले प्रवासीही काही तरी विचित्रच वागत होते जस काही ते गाडीत नाही बारमध्ये बसले आहेत. 

हा सगळा अनुभव त्याच्यासाठी नवीन होता. त्याने कंडक्टर कडे बघितलं आणि तो ज्या दिशेने बघत होता तिकडे बघितलं एक स्त्री चालत्या बसमध्ये चढत होती. अगदी निवांतपणे. जणूकाही ती हवेवर तरंगत आहे. 

अंगात आहे नाही तेवढं त्राण गोळा करून कंडक्टर पुढे झुकत त्याला म्हणाला ," चुकुन सुद्धा तिच्या डोळ्यात बघू नका. जमलं तर ती रिंगटोन लावा. ", कारण गडबडीत त्याचा फोन सीटखाली पडला होता आणि तो फोन उचलायला वाकला तसा कुणीतरी त्याचा हात धरला होता. 

पण कंडक्टर च्या सांगण्याआधीच त्याने तिच्या डोळ्यात बघितलं होतं. आणि तो  सीटवरून उठून तिच्यामागे चालू लागला. 

इकडे त्याच्याशी बोलल्यापासून त्याच्या बायकोचा जीव वरखाली होत होता. तिने पुन्हा त्याचा नंबर डायल केला पण तो लागला नाही. शेवटी तिला काय वाटलं माहीत नाही पण देवासमोर जाऊन बसत तिने फोन लावायला सुरुवात केली. 

जवळपास दहा मिनिटांनी फोन लागला आणि .....

फोनची रिंगटोन वाजू लागली. त्याला एक जोरदार झटका बसला आणि तो भानावर आला. 

तो चालत्या गाडीतून बाहेर पाय टाकणार होता. 

ड्रायव्हर आणि कंडक्टर च्या तोंडातून भितिने शब्द फुटत नव्हते. 

त्याची रिंगटोन बंद झाल्याने त्याच्या पुढे असलेली ती रागाने मागे वळत होती. 

पण अचानकच पुन्हा एकदा वातावरण बदलले होते. तेवढ्यात सावरत कंडक्टर ने खाली पडलेला फोन उचलून ती रिंगटोन वाजवायला सुरूवात केली. 

ड्रायव्हरने जीव खाऊन बस गावाच्या हद्दीत घुसवली. 

सगळ्यानी मागे वळून बघितलं तर अर्धवट जळलेल्या कलामंदिराच्या आवारात  विचित्र अवतारात असलेल्या त्या सगळ्या जणी त्यांच्याकडे जळजळीत नजरेने दातओठ खात बघत होत्या. 

आज बऱ्याच दिवसांनी १३ जण त्यांच्या हाती येता येता निसटले होते. 

पहिल्यांदा गावाच्या वेशीबाहेर असलेल्या कलामंदिराच्या गारुडातुन कुणीतरी निसटले होते. 

कंडक्टरचा फोन अजूनही तीच रिंगटोन वाजवत होता. 

त्या रिंगटोन च्या आवाजात घुंगराचा आवाज हळूहळू कमी होत गायब झाला होता.

काय होती रिंगटोन? तुम्हीच सांगा बघू तुम्हाला लक्षात येतेय का? 

नाहीतर बघा हं आज नेमकं विकेंड आहे तिच्या नजरेच्या गारुडात अडकला तर कुणीही वाचवायला येणार नाही. 

#गौरीहर्षल 

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ही ringtone Kiva श्री स्वामी समर्थ ही असावी
सुप्रिया मते म्हणाले…
अनुसया अत्री सुकुमारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
किंवा
श्रीराम जयराम जय जय राम

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी आणि करुणात्रिपदी

आज कुछ अच्छा पढते हैं

कालाय तस्मै नमः कथेमुळे वाचकांना आलेला अनुभव