way out

वे आऊट 
जवळपास एक आठवडा होत आला अजूनही मला प्रीतीने फोन नाही केलाय. अनुष्का तिच्याच विचारात गुंतलेली होती.
"प्रीती" तिची सगळ्यात जवळची मैत्रीण.
 एकच शाळा, एकच कॉलेज आणि त्यानंतर नोकरी सुद्धा एकाच बिल्डिंगमध्ये पण वेगवेगळ्या ऑफिसमध्ये.
ऑफिस जरी वेगवेगळे असले तरी जाता येता दोघे एकत्र असायच्या. त्यामुळे सातत्याने एकमेकींच्या आयुष्यात काय घडतंय हे एकमेकींसोबत शेअर करणं हे ओघाने आलच.

 नवीन ऑफिस जॉईन केल्यानंतर हळूहळू अनुष्काला मात्र जाणवायला लागलं की प्रीती तिला टाळण्याचा प्रयत्न करते.
 कधी कधी प्रीती तिला सांगायची की मला बरं वाटत नाहीये आणि त्या दिवशी ती बाहेर फिरायला गेलेली असायची.
 कधी दोघींचा प्लान करायचा आणि तो लास्ट मिनिटला ती कॅन्सल करायची.
 या गोष्टी अनुष्काने तेवढ्या मनावर घेतल्या नाहीत.
 पण नुकतंच जे काही तिने स्वतः बघितलं ते बघितल्यानंतर मात्र ती मनातून दुखावली गेली.

 ज्या प्रीतीच्या वाढदिवसासाठी अनुष्का सरप्राईज प्लान करत होती. ती प्रीती अनुष्काला टाळून इतरांबरोबर तो वाढदिवस साजरा करण्याचा प्लॅनिंग करत होती.
 जर त्या दिवशी अनुष्का हॉटेलमध्ये प्रीतीच्या मागच्याच टेबल वरती बसलेली नसती तर तिला ती गोष्ट कधीच कळली नसती.
 पण तिचं सुदैव म्हणून प्रीती तिच्याबद्दल काय विचार करते हे तिला समजलं. 
 प्रीती तिच्या ऑफिसच्या नवीन मैत्रिणींबरोबर वाढदिवसाचं सेलिब्रेशन प्लॅन करत होती.
 वीकेंडला रिसॉर्टवर जाऊन सेलिब्रेट करण्याचा त्यांचा प्लॅन होता. त्या मैत्रिणींपैकी कोणीतरी तिला विचारलं की," अगं अनुष्काला बोलवणार आहेस का?"
 त्यावर प्रीतीचे रिएक्शन अशी होती की," सारखं सारखं तिला नाही बोलवायला आवडत मला. किती वर्ष झाले आम्ही एकत्र आहोत. पण ती कधीच मला माझी स्पेस देत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये तिचा सहभाग... खरं सांगायचं तर तिचं असं सारखं मला चिकटून असणं मला कधीच आवडलं नाही. पण मला तिच्यामुळे फायदा होत होता म्हणून मी तिच्याबरोबर होते. 
आणि मला शक्य झालं असतं तर मी तिच्यासारख्या मुली बरोबर मैत्री पण केली नसती.",
"तिच्यासारख्या म्हणजे?", तिथे बसलेल्या मुलींपैकी एकीने विचारलं.
 "अग तिच्यासारख्या म्हणजे ती बरीच वेगळी आहे. तिच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. तिला पब पार्ट्या या गोष्टी आवडत नाहीत. ती फारशी मुलांची क्लोज होत नाही. आणि तिच्यामुळे मलाही कधी कोणाबरोबर मिक्स होता आलं नाही. आताही बघ ना पैसे आहेत तर आपण छान मॉडर्न लाइफस्टाइल अफोर्ड करू शकतो पण तिला मात्र तसंच राहायचं आहे. काकूबाई कुठली.",असं म्हणून प्रीती हसू लागली.
 बाकीच्यांनीही तिच्या हसण्यात सहभाग नोंदवणं योग्य समजलं. 

हे सगळं ऐकणारी अनुष्का मात्र मनातून प्रचंड मोडून पडली. साहजिकच होतं जवळपास बारा-पंधरा वर्ष त्या दोघी एकत्र होत्या.
 अगदी वयात येण्यापासून ते चेहऱ्यावर पहिल्यांदा मेकअप करण्यापर्यंत सगळं काही ज्या मैत्रिणीसोबत शेयर केलं ती कधीच आपल्याला मैत्रीण मानत नव्हती हे ऐकल्यानंतर अनुष्काला वाईट वाटलं. त्यादिवशी अनुष्का तिथून घरी निघून आली. पण तो विचार मात्र तिच्या मनातून निघत नव्हता. दुसऱ्या दिवशी तिने सवयीने सकाळी प्रीतीला फोन लावला. प्रीती अर्थातच तिची वाट बघत होती. कारण ती नेहमीच अनुष्का सोबत तिच्या गाडीवर ऑफिसला जायची. प्रीतीकडे स्वतःची गाडी होती पण ती गाडी प्रीती कधीच आणत नसे.

 आता अनुष्काला बऱ्याच गोष्टींचा अंदाज येऊ लागला होता. शक्य तेवढ्या गोष्टी, वस्तू, पैसे अनुष्काचे वापरून घेऊन प्रीती तिला मात्र स्वतःपासून स्वतःच्या गोष्टींपासून लांब ठेवत असे. म्हणजे एकंदरीत इतकी वर्ष प्रीतीने अनुष्काचा फायदा उचलला होता. प्रीतीच्या मनासारख्या गोष्टी घडल्या नाही की ती रुसून बसत असे,अनुष्काशी बोलणं बंद करून टाकत असे.
 अशा वेळेला अस्वस्थ होणारी अनुष्का प्रीतीला मनवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करत असे. प्रयत्न करताना स्वतःला त्रास होतोय स्वतः हे लक्षात येऊन सुद्धा अनुष्का प्रीतीच्या मैत्रीखातर हे सगळं करत असे. आता मात्र अनुष्काला या सगळ्या गोष्टी आणि त्या मागची कारण कळून चुकली होती. पण त्यावर आपण नेमकं कसं वागायचं हे तिला कळत नव्हतं. कोणाला तोंडावर बोलून तोडून टाकणं हा तिचा स्वभाव नव्हता. मग यावर उपाय म्हणून अनुष्काने आपल्या परीने उपाय शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 

तुमच्या सोबत सुद्धा असं काही झालं आहे का वाचक मित्रमैत्रिणींनो? 
जवळच्या एखाद्या नात्यात आपण स्वतःला झोकून देऊन involve असतो. त्या व्यक्तीला खुश करण्यासाठी आपण जीव तोडून प्रयत्न करत असतो. आणि आपली वेळ आली की ती व्यक्ती मात्र मला असलं काही येत नाही अशा आविर्भावात असते. 
People pleasing ही टर्म हेच सांगते इतर लोकांची मर्जी सांभाळण्यासाठी स्वतःला त्रास करून घेणे . 
या चक्रातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न हे स्वतःलाच करावे लागतात. कारण आपण आपल्या वागण्यातून समोरच्या व्यक्तीला कुठेतरी आपल्याला गृहीत धरण्याची सवय लावलेली असते. 
आणि कधी कधी समोरची व्यक्ती सुद्धा संधीसाधू असते. 
जेंव्हा आपण या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू करतो तेंव्हा अर्थातच आपल्याला विरोध केला जातो. 
कधी कधी तर हा विरोध इतरांपेक्षा जास्त स्वतःकडून केला जातो. 

स्वतःला प्रायोरिटी दिल्याने अपराधी वाटणे हे त्याचंच लक्षण. 

स्टेप बाय स्टेप स्वतःला या गोष्टी पटवून देत कृती करण्यावर भर दिला तर नक्कीच हे सगळं बदलू शकतं. 
पण आपल्याला सुरुवातीला वाटणारे गिल्ट, इतरांचा विरोध, वाद, रुसवे फुगवे आणि काही प्रसंगी दूर होणारी नाती हे सगळं सहनच होत नाही. आणि पुन्हा पुन्हा आपण तेच करणे स्वीकारत राहतो. 

जुनाट आजार नीट होण्यासाठी कसं मुळापासून दिनचर्या बदलावी लागते हेही तसच काहीसं असतं. 
फक्त इथे स्वतःचे शरीर, मन , मेंदुच नाही तर इतर लोकांकडूनही या बदलांसाठी विरोध केला जातो. 
हा विरोध मोडून काढण्यासाठी प्रयत्न आपल्यालाच करावे लागतात. कारण गोष्ट आपल्या मनस्वास्थ्याशी संबंधित असते. 

वरच्या गोष्टीत असलेल्या अनुष्कानेही असेच प्रयत्न सुरू केले. 
तिला जसा त्यातून बाहेर पडण्यासाठी त्रास झाला तसाच त्रास इथे प्रितीलाही झाला. कारण तिला अनुष्काचा फायदा उचलून जगण्याची सवय झालेली होती. तिने त्यासाठी अनुष्काला मनस्ताप देण्याचा प्रयत्न केला. पण अनुष्का आपल्या बाजूने ठाम होती. 

अनुष्काने मात्र समोरासमोर वाद घालणे टाळत स्वतःसाठी इतर मार्ग शोधले. जसं की ऑफिस ब्रांच बदलणे, नवीन काही क्लासेस जॉईन करणे. जेणेकरून तिला प्रितीसोबत जास्त वेळ राहावे लागणार नाही. या गोष्टी सोप्या नव्हत्याच पण तिने त्या जमवल्या. स्वतःसाठी, स्वतःच्या चांगल्या भविष्यासाठी. 

जर एखादी व्यक्ती तिच्या आयुष्यात आपल्याला जागा देत नसेल तर त्यासाठी आपण जबरदस्ती करून काही उपयोग होत नाही. 
ते म्हणतात ना की, If they don't see the value of having you, then don't try to convince them.

आपल्याला शारीरिक, मानसिक पातळीवर त्रासदायक असणाऱ्या गोष्टी, व्यक्ती जर आपल्याला स्वतःपासून दूर करता येत नसतील तर अर्थातच आपली परिस्थिती "अग अग म्हशी मला कुठं नेशी" अशी असते. 

आणि महत्वाचा मुद्दा प्रत्येक वेळी दूर करणे म्हणजे तोडून टाकणं नसते. प्रत्येक नात्यात मर्यादा निश्चित करून नाती सांभाळता येतात. सगळा त्रास आपणच सहन करायला हवा ही मनोवृत्ती मात्र त्यागणे जमलं पाहिजे. 

गौरी हर्षल कुलकर्णी 
(एम ए क्लिनिकल सायकॉलॉजी, समुपदेशन ) 
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल 

टिप्पण्या

स्वप्नाली म्हणाले…
खुप छान ताई.तुझ्या प्रत्येक छान संदेश असतात जे रोजच्या आयुष्यात कसं जगावं, कस वागावं ते शिकवतात👌😊
स्वप्नाली म्हणाले…
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी आणि करुणात्रिपदी

feel it heal it...from 1-365 days of self care

learn from experience...2-365 days of self care